मुंडन संस्कार | कर्णवेधन संस्कार | बाळाचे जावळ कसे काढावे

लहानपणी कान का टोचतात

मुंडन संस्कार

बाळाचे जावळ कसे काढावे

जन्मानंतर ३ ते ५ वर्षापर्यंत हा संस्कार केला जातो. जन्मानंतर पहिल्यांदाच बाळाच्या डोक्यावरील केस कापले जातात.

कर्णवेधन संस्कार

बाळाची कान टोचणी

रक्षाकर्माच्या हेतूने तसेच विशिष्ट व्याधीक्षमत्व प्राप्त होण्यासाठी हा संस्कार करतात. ६ व्या, ७ व्या किंवा ८ व्या महिन्यात स्वस्थ बालकाच्या कानाला दैवकृत छिद्राच्या ठिकाणी शुभदिवशी शीत काळात वेधन करावे. बाळाला आईच्या कुशीत बसवून सांत्वन करुन (शांत बसवून) मुलगा असेल तर प्रथम उजवा, मुलगी असेल तर डावा कान टोचावा.

कानाच्या पाळीच्या मध्यभागी जेथे पातळ त्वचा असते ज्यामधून सूर्य किरण परावर्तित होतात तेथे बाळाला स्थिर ठेवून कान टोचावा. हे काम एकाच वेळेत व त्वरित करावे. कान टोचल्यानंतर त्यात तेलाने भिजवलेला दोरा घालून ठेवावा. कानात सूज किंवा वेदना असल्यास लगेच दोरा काढून टाकावा. व त्याठिकाणी एरंडमूळ, मंजिष्ठा, जव आणि तीळ यांचे बारीक चूर्ण करुन जखम भरुन येईपर्यंत लावावे. कान उत्तम टोचल्यानंतर तीळ तेल लावावे व प्रत्येक ३ऱ्या दिवशी मोठा दोरा घालून तेल सोडावे.

कान टोचण्याचे महत्त्व /फायदे –

आयुर्वेद आचार्य सुश्रुत यांनी आपल्या ग्रंथात (१९/२१) सांगितले आहे की यामुळे आंत्रवृद्धी (हर्निया) हा रोग होत नाही. बालकाचे स्वास्थ्य रक्षण होते आणि सौंदर्य अलंकार घालण्यासाठी कान टोचावे.

आधुनिक शास्त्राच्या परिक्षणांच्या आणि संशोधनात असे आढळून आले आहे की कानाच्या पाळीचा भाग हा प्रजनन संस्था चांगली रहावी यासाठी महत्त्वाचा आहे.

तसेच स्रीयांचे पाळीचे आरोग्य सुस्थितीत रहावे यासाठी या भागाचा उपयोग होतो. शरीराच्या हालचाली डाव्या आणि उजव्या मेंदूकडून नियंत्रित केल्या जातात. या दोन मेंदूंना जोडणारा मध्यबिंदू हा कानाच्या पाळी जवळ असतो (दैवकृत छिद्र).

ऍक्युप्रेशर उपचारासाठी संशोधन करणाऱ्या तत्त्वांच्या म्हणण्यानुसार या भागावर ठराविक काळ दाब / प्रेशर दिले असता दोन्ही मेंदुंना जोडणाऱ्या उर्जा वाढतात आणि यामुळे मेंदुच्या वाढीस चालना मिळून मेंदूचे कार्य चांगले होण्यास मदत होते.

आपल्याला सुद्धा लक्षात असेल शाळेत किंवा घरी काही चूक झाल्यास आपले कान पिळले जायचे. त्यावेळी ती जरी शिक्षा वाटत असली तरी त्यामागे आपण केलेली चूक लक्षात रहावी, ती पुन्हा होऊ नये याचे स्मरण रहावे त्यासाठी मेंदूला चालना मिळावी हा हेतू असावा.

तसेच एखादी गोष्ट परत न करण्याच्या बाबतीत बोलताना, “कानाला खडा” हा वाक्प्रचार वापरला जातो तोही हेच दर्शवतो. मेंदू सजग रहावा,त्याला चालना मिळावी यासाठी केलेले हे उपाय होय.

नैराश्य, OCD (सतत स्वच्छतेचा आग्रह करणारे, केलेले काम पुन्हा पुन्हा तपासून पाहणारे, कुलूप लावलेले असून पुन्हा पुन्हा ओढून पाहणारे, गाडीचे हॅन्डल लॉक करून परत सतत हलवून पाहणारे वगैरे), अस्वस्थता यासारख्या आजारात ह्या भागावर प्रेशर देऊन प्रयोग कररण्यात आले आहेत.

परंतु आमच्यामते असे आजार असणाऱ्या लोकांनी ऍक्युप्रेशर तज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.

कर्णपालीचे हे महत्व

पूर्वजांना अचूक माहित

तंत्र कान टोचण्याचे त्यांस

अचूक होते अवगत!

तल्लख बुद्धीचा केला विचार,

त्यात स्त्रीशरीराचा उद्धार,

देण्या सुप्रजेला आकार

सांगितला कर्णवेधन संस्कार!

कानाचा मध्यबिंदू ,

दोन्ही मस्तिष्कांना जोडे ,

कान पिळण्याचे महत्त्व नसे थोडे,

चूकभूल झाल्यास लावले

म्हणून कानाला खडे!