निष्क्रमण संस्कार

४ थ्या महिन्यात शुभ दिवस / नक्षत्र स्थिती पाहून बालकास स्नान घालून नवे वस्त्र व सुंदर अलंकार घालून आई /धात्री सोबत प्रथमच घराबाहेर नेऊन मंदिरात घेऊन जावे. भगवान विष्णू, कुलदेवतांची गंध, पुष्प यांनी पूजा करुन ब्राह्मणादींचा आशीर्वाद घ्यावा. सूर्य देवतेचा आशीर्वाद घ्यावा. बालकाच्या आरोग्यासाठी शरीरातील तेज म्हणजेच उष्ण गुण (पित्त) यांचा अन्नपचनाशी जवळचा संबंध आहे. निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी सूर्याची प्रार्थना करणे हा एक भाग आहे.

निष्क्रमण संस्कारांमध्ये आईने सुध्दा उन्हात बसावे अथवा चालावे. अनायसे नोकरी करणाऱ्या स्त्रियाही सहा महिन्यासाठी तरी सुट्टीवरती असतात. तर त्यामुळे त्यांना सूर्याचे ऊन यादरम्यान चांगल्या रीतीने मिळू शकते. डिलिव्हरी नंतर एक ते दीड महिना झाल्यानंतर स्त्रीही नॉर्मल होते. त्यामुळे तिनेही सूर्यकिरण जरूर घ्यावे. त्याचप्रमाणे बाळाला सुद्धा गँलरीमध्ये अथवा गच्चीवर सूर्य किरणांमध्ये ठेवायला हरकत नाही.

सकाळी सूर्योदय झाल्या नंतरचे पहिले एक – दोन तासातील सूर्य किरण हे माता आणि बालक दोघेही घेऊ शकतात. सूर्यामुळे शरीरातील अन्नपचनाची शक्ती वाढते. तसेच सूर्याकडून मिळणारी ऊर्जा ही बाळाची बुद्धी वाढवण्यासाठीही मदत करू शकते. कोवळी सूर्यकिरणे बाळाच्या डोळ्यावर पडली असता बाळाच्या डोळ्यांची शक्तीही वाढते।त्याचप्रमाणे शरीराला आवश्यक असे जीवनसत्वसुद्धा सूर्यकिरणांपासून मिळतात. माता ही जर सूर्य किरणांमध्ये अर्धातास जरी बसली अथवा चालली तरी मातेच्या शरीरात सुद्धा जीवनसत्व वाढू शकतात. मातेचा अग्निसुद्धा चांगला राहू शकतो. त्यामुळे तिच्या दूधाची क्वालिटी सुधारू शकते.

विटामिन डी:-

आपल्या भारतामध्ये सर्वांचेच विटामिन डी हे अतिशय कमी आहे. आपल्याकडे सूर्य इतका भरपूर उपलब्ध असूनही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे विटामिन डी अतिशय कमी असते. विटामिन डी हा शरीरातील विविध कार्यासाठी लागणारा अत्यावश्यक घटक आहे. आणि तो सूर्यापासून आपल्याला सहज नैसर्गिक मिळतो. सर्वात मोठा साठा सूर्यापासूनच आपल्याला मिळत असतो. त्यामुळे डिलिव्हरी नंतर मातेला विशेष कामाची जबाबदारी नसते. नोकरी करणाऱ्या महिलांनाही सुट्टी असते. तर त्यामुळे मातेनेसुद्धा सूर्य किरणांचा लाभ जरूर घ्यावा. तसेच बाळाला सुद्धा सूर्य किरणांमध्ये अर्धा-पाऊण तास ठेवायला हरकत नाही. सूर्य चांगला उगवल्यानंतरची किरण असावी म्हणजे सूर्योदयानंतर साधारणत एक- दोन तासातील असावीत.

दाता तो सूर्य धगधगता

पोषण करी जगाचे म्हणून

लोक म्हणती त्यास नारायण

उर्जेचे तो रुप तोच असे कारण

जडला जया तमविकार,

त्यासी रवीकिरणांचा आधार!