क्षीरान्नाद अवस्था

या अवस्थेत बालक दूध व अन्न या दोन्हींचे सेवन करत असते. बालकाची ही अवस्था सहा महिन्यापासून दोन वर्षापर्यंत असते. या अवस्थेत बालकास दुधाबरोबर अन्नाचे ही सेवन करविले जाते व हळूहळू अन्नाची मात्रा वाढवून दोन वर्षापर्यंत बालक मातेचे दुध पिणे सोडून देते. बालकास दिला जाणारा आहार हलका परंतु पोषण व वाढ करणारा असावा. साधारणतः वयाच्या सहाव्या महिन्यापासून बालकांना दात येऊ लागतात व अन्नाचे चर्वण ही दातानेच केले जाते म्हणून या काळात बालकास खूप कमी मात्रेत पातळ व हलक्या आहाराने सुरुवात करून जसे दात येऊ लागतील तसतसा त्याचा आहार वाढवणे अपेक्षित आहे.

बालकास आहार चालू करताना काही गोष्टींची काळजी घेणे अपेक्षित असते. बालकास सुरुवातीला नवीन पदार्थ लवकरात लवकर चालू करावा; कारण बालकाची चवीची संवेदना टेस्ट बड्स विकसित नसते त्यामुळे नवीन पदार्थ स्वीकार करण्यास त्रास देत नाहीत व त्याला सर्व चवीचे पदार्थ खाण्याची सवय लागते.

चव व रुची यावी यासाठी

वीन पदार्थ कमी मात्रेत सुरू करुन बालकाला कसा पचनी पडतो आहे त्यानुसार वाढवत जावा. तसेच एका वेळी एकच नवीन पदार्थ चालू करावा जेणेकरून तो त्याला पचला आहे की नाही हे कळेल. लहान मुले काही वेळा एखादा पदार्थ खाता खाता अचानक त्याविषयी अरुची दाखवतात व तो खाणे बंद करतात, भरवला असता उलटी काढतात; अशावेळी तो जबरदस्तीने न देता बंद करावा.

काही दिवसांनी तो आपोआप खायला लागेल. नवीन पदार्थ सुरू करताना प्रथम तो पदार्थ शिजवून त्यांचे पाणी उदारणार्थ भाताची पेज, डाळीचे पाणी देऊन नंतर हळूहळू खिरी प्रमाणे पातळ करून म्हणजेच तांदूळ व मूग यांचे खिरी प्रमाणे पातळ मिश्रण नंतर मूगाच्या खिचडी प्रमाणे थोडे घट्ट पातळ व नंतर फळभाज्या व पालेभाज्या घालून भाताप्रमाणे मऊ अशा पद्धतीने क्रमाक्रमाने बदल करून द्यावेत. या सर्व पदार्थांना चव व रुची यावी यासाठी आले, धने, जिरे मिरे, ताक यांचा युक्तीने उपयोग करावा.

आहार-

बालकास दिला जाणारा आहार स्वच्छ,ताजा, सुखोष्ण (थंड नसणारा असा) , दूध व तूप घालून स्निग्ध केलेला, विरुद्ध नसलेला व पचनास हलका असावा. बालकाला आहारामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यासारखी जुनी धान्य, जुने तांदूळ, सर्व प्रकारच्या डाळी फळभाज्या व पालेभाज्या घ्याव्यात. त्याचबरोबर बालकाचे अन्न बनवताना त्यामध्ये तीळ ,कारळे, शेंगदाणे, जवस यांचे कूट घालावे; जेणेकरून सर्व प्रकारचे सूक्ष्म पोषण तत्वे म्हणजेच *मायक्रोन्यूट्रिएंट* बालकाला मिळतील.

या अवस्थेतील बालकांसाठी बाजारात फॅरेक्स, सेरेलॅक यासारखी तयार खाद्य मिळतात. परंतु कोणत्याही ताज्या अन्नापेक्षा हे वापरणे चांगले नसते. तसेच बाजारात “नाचणी सत्व” नावाचा ट्रेंड खूप चालतो आहे. परंतु आचार्यांनी मूळात नाचणी हीच क्षुद्र धान्य वर्गात घेतलेली आहे. मग त्याचे सत्व ते काय निघणार? पण बरेचसे लोक त्याचा रोजचा आहार म्हणून उपयोग करताना दिसतात जे चुकीचे आहे. याचबरोबर बालकांना आहारामध्ये सर्व प्रकारची फळे देणे हे ही या क्षीरान्नाद अवस्थेत अपेक्षित आहे. अशाप्रकारे सर्व पौष्टिक गोष्टींनी युक्त आहार सेवन केल्यामुळे बालकाचा शारीरिक बौद्धिक व मानसिक तिन्ही प्रकारचा विकास एकदम उत्तम प्रकारे होतो.