आईची काळजी –

मातेने कोणती काळजी घ्यावी याबद्दल काही मुद्द्यांची चर्चा इथे करुया. डिलिव्हरी नंतर ओटीपोटाला, गर्भाशय, कमरेच्या हाडांना आधार मिळावा यासाठी पोटाला पट्टा बांधायला सांगितला आहे. आईला मालिश करण्यासाठी तेलाचा वापर करावा. त्यामुळे शरीरातील वात कमी होतोच शिवाय पोट, ओटीपोट यासारख्या भागातील स्नायू ढिले पडलेले असतात त्यांना बळकटी येते. “बला तेलाचा” उपयोग हा फायदेशीर ठरतो. परंतु यासाठी शक्यतो वैद्यांचा सल्ला घेऊनच योग्य ते तेल वापरावे.

बाळंतिणीला धुरी देणे – :

बाळंत झाल्यावर शरीरात वाताचे विकार वाढू नयेत म्हणून यासाठी घमेल्यात विस्तवावर वावडिंग, शेपु, ओवा, गुग्गुळ टाकून धूर करतात बाजेवर किंवा खाटेवर पातळ कपडा टाकून त्या बाजेखाली किंवा खाटेखाली विस्तवावर वावडिंग, ओवा, गुग्गुळ जटामांसी अशा वनस्पतींच्या समिधा टाकून धूप/धूर करतात बाळंतिणीच्या अंगावर चादर गुंडाळून बसण्यास सांगतात.

साधारण सव्वा महिना असे धुरी दिल्यावर स्त्रीला वात्या म्हणजेच ओटी पोट मोठे होत नाही, अंगात चमका निघत नाहीत थोडक्यात कोणत्याही प्रकारचा वाताचा त्रास होत नाही म्हणून बाळंतिणीला धूपन /धूरी देण्याचा प्रकार हा परंपरागत आहे. त्याचबरोबर आंघोळीनंतर योनि भागात सुद्धा या जंतुघ्न औषधांची धुरी घेतल्यास त्या भागाला आलेली शिथिलता दूर होऊन बल प्राप्त होते.

याव्यतिरिक्त सिजर झालेल्या महिलांनी त्यांच्या टाक्यांची व योनी भागाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी हा भाग त्रिफळा च्या काढया ने धुणे स्वच्छ कपड्याने कोरडा करून नंतर जंतुघ्न औषधांची धुरी घेणे उपयुक्त ठरते.

मातेने आपल्या शरीराचे तापमान उबदार राहील याकडे विशेष लक्ष द्यावे. हवेच्या झोतापासून स्वतःचे रक्षण करावे. गरम झाले तरी फॅन खाली डायरेक्ट बसू नये अथवा झोपू नये. पूर्वी गरम पाण्याने हात पाय तोंड धुण्याची पद्धत होती. तसेच डोक्याला ही विशेष कपडा बांधून डोक्याचे संरक्षण केले जात होते.

गारव्यामुळे मातेच्या शरीरातील वायू वाढू नये यासाठी दक्षता घेतली जात होती. शरीरातून ऊर्जा बाहेर पडताना नेहमी टोकाकडून बाहेर पडत असते. जसे की तळहात, तळपाय, डोके हे होय. उष्णता शरीरात कोंडून राहिली तर केस गळणे, हात पाय फुटणे ही लक्षणे दिसतात.

त्यामुळे मातेचे हात पाय धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे. कारण अचानक थंड पाण्याचा वापर हात पाय या भागावर झाल्याने हा उष्मा शरीरात कोंडला जाऊन त्रास होऊ शकतो. कफही वाढू नये, शरीराचे तापमान संतुलित राहावे ऊबदार राहावे, बाळाला सहज पचेल असे दोषरहीत दूध तयार होणे हा यामागे उद्देश आहे. परंतु हे सारे विसरून गेल्याने अलीकडे याचा वापर होत नसल्याने अनेक स्त्रियां अल्पवयातच विविध वात विकारांनी त्रस्त झाल्याचे दिसते, कंबरदुखी, सांधेदुखी‌ सुरू होते वजन वाढू लागते व शरीर बेढब झाल्याचे प्रमाण पाहायला मिळते.