आईच्या आहारातील घटक

आईच्या आहार

सर्व प्रकारचे ऋतूनुसार फळभाज्या, पालेभाज्या, फळे, सुका मेवा आहारात ६ महिने ते वर्षभर असावा. सुका मेव्यामध्ये बदाम, अक्रोड यांचा समावेश असावा ज्याच्यामुळे शरीरात ताकद निर्माण होते.

 आईच्या आहारात डिंकाचा वापर असावा. कारण डिंक हा त्याच्या चिकट, स्निग्ध गुणांनी मातेच्या दुर्बल झालेल्या शरीरात ताकद निर्माण करतो. यासाठी डिंकाचे लाडू करता येतात. तसेच दूधामधून बाळाच्या शरीरालाही बळकटी मिळावी हा उद्देश आहे. काही कालानंतर डिंक लाडू खायची इच्छा होत नसल्यास जेवणानंतर एक – एक चमचा डिंकलाही घ्यावी. डिंकलाही खाल्यावर थोडेसे गरम पाणी प्यावे. थंड पाणी पिऊ नये. डिंकाचे पचन होण्यास गरम पाणी मदत करते.

 गायीचे दूध, ताक, तूप असावे. जिथे जिथे गायीचे सांगू तिथे तिथे देशी गायीचे अभिप्रेत आहे. याआधीच्या लेखात देशी गायीच्या दूधाचे फायदे सांगितलेच आहेत.

 धान्यांमध्ये ज्वारी, नाचणी पासून बनवलेली भाकरी असावी. हातसडीच्या तांदळाचा भात/ खिचडी असावी. गव्हाचा वापर शक्यतो कमीत कमी करावा अथवा टाळावा. गहू हा पचण्यास जड आहे.

 कडधान्ये भिजवून मोड आणून त्याची उसळ करून देऊ शकतो विशेषतः मूग, मसूर, चवळी, मटकी. डाळीचे वरण विशेषतः मूगाची डाळ चांगली आहे.

रिफाइन्ड तेलाऐवजी लाकडी घाण्यावरचे शुध्दतेल वापरावे. यामुळे तेलातील सत्वांश टिकून राहतात.

 साखरेचा वापर टाळावा. त्याऐवजी सेंद्रिय गूळ, काकवी यापासून पदार्थ बनवू शकतो. लाडू बनवतानाही साखर वापरू नये त्याऐवजी सेंद्रिय गुळ ,खारीक तुपात तळुन त्याची पावडर करून वापरली असता लाडूला योग्य ती गोडी येते. रिफाईंड तेल, डालडा या पासून बनवलेले पदार्थ पूर्णतः बंद करावे. उदा. बेकरीचे सर्व पदार्थ बिस्किटे, फरसाण वगैरे.

 आयोडाइज्ड मीठाऐवजी सैंधव मीठाचा वापर करावा.

 मन जितके शांत राहील त्यानुसार तितके उच्च गुणाचे दूध मातेच्या शरीरात निर्माण होते. यासाठी मनाला सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करावा. मोबाईल पासून बाळाला तसेच स्वतःलाही दूर ठेवावे. कारण बालकाच्या शरीर तसेच मनावर मोबाईलच्या लहरींचा अपाय होतो. मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या लहरींचे तोटे आपण ऐकले असतीलच. टीव्ही पासूनही दूर ठेवावे. मनोरंजनासाठी काही ऐकावेसे वाटले तर भक्ती संगीत , विविध वाद्यांचे संगीत ,श्लोक मंत्र इत्यादी संगीत ऐकू शकतो. विशेषतः बाळाला दुध पाजताना मंत्र संगीत, ओंकार संगीत जरूर ऐकावे.

बाळाला दूध किती दिवस चालू ठेवावे याबाबतीत काही मतभिन्नता आढळते. काही माता बाळ १ ते दिड वर्ष झाल्यानंतर बाळाचे दूध बंद करतात. याला त्या मातांच्या नोकरीसारखी कारणेसुद्धा असू शकतात. परंतु साधारण दोन वर्षांपर्यंत म्हणजे दुसरा टप्पा पूर्ण होईपर्यंत दूध चालू ठेवले तर ते बाळाच्या रोगप्रतिकारक्षमता तसेच बलवृद्धीसाठी उपयोगी ठरते.

संगीताचा वापर –

झोपवतानाही संगीताचा वापर करू शकतो. गायत्री मंत्र, ओमकार ध्वनी , विष्णू स्तोत्र, देवी स्तोत्र, दत्त स्तोत्र इत्यादी मंत्रांचा ध्वनी हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करुन बाळाच्या मनावरही चांगला परिणाम होऊ शकतो.

 पाणीसुद्धा गरम पिण्याची पद्धत होती. गरम पाणी प्यायचे झाले नाही तरी निदान पाणी उकळून तरी ठेवावे. उकळलेले पाणी पचायला हलकेअसते ते नंतर पुन्हा गरम करण्याची विशेष आवश्यकता नसते तरीसुद्धा बाहेरील वातावरण थंड किंवा पावसाळी असेल तर मात्र गरम करूनथंड झालेले पाणी सुद्धा पुन्हा थोडेसे गरम जरूर करावे. मातेच्या शरीराचे तापमान संतुलित राहील. माता आजारी पडू नये व पर्यायाने बाळाचे आरोग्य चांगले रहावे हा यामागचा हेतू आहे.

बाळंतपणानंतर किमान २ वर्षे काळ हा स्रीयांनी स्वतः च्या आरोग्याच्या दृष्टीने लक्ष देण्याचा आहे. या काळात सकस आहार, दूध यासोबतच स्रीयांनी डिंक (जेवणानंतर एक चमचा), सुकामेवा (बदाम, अक्रोड) हे घ्यावे. जेणेकरून धावपळीच्या जीवनात त्यांच्या शरीराला पोषणाची कमतरता भासणार नाही. हाडांचा ठिसूळपणा, कॅल्शिअमची कमतरता, थकवा यासारख्या लक्षणांसाठी इतर कोणत्याही औषधांची गरज भासणार नाही.