आहारात सर्वभुतानी संभवन्ति महिपते|

आहारेण विवर्धन्ते तेन जीवन्ती जन्तव: ||

(महाभारत)

आहारापासून (अन्नापासून) सर्व प्राणिमात्र उत्पन्न होतात आहारामुळे त्यांचे संवर्धन होते अशाप्रकारे आहाराने सर्वजण जिवंत राहतात. “अन्न हे पूर्णब्रम्ह” इतके सुंदर वर्णन आहाराचे आचार्यांनी केले आहे.

विधीविहितम् अन्नपानम् प्राणीनाम् प्राणीसंज्ञकानाम् प्राणाम् आचक्षते कुशलः | चरक संहिता

आहार हा विधीपूर्वक बनवून घेतल्यास असा आहार मनुष्यासाठी प्राण समजला जातो कारण अशा आहाराचे मिळणारे फळ म्हणजेच उत्तम आरोग्य.

प्रत्येकाची शारीरिक ताकद, आरोग्य आणि आयुष्य हे पचन क्रियेवर अवलंबून असते. हे पचनाचे कार्य सतत चालू ठेवण्यास योग्य आहाररुपी इंधन देणे आवश्यक असते. या आहारावरच शरीराचे सर्वांगिण पोषण, शरीराची ताकद, शरीराचा वर्ण, मनाचे सामर्थ्य आणि सर्व इंद्रियांची प्रसन्नता यांसारख्या सर्व गोष्टी अवलंबून असतात. असा हा आहार बालकांच्या दृष्टिकोनातून सुरुवातीपासूनच अत्यंत महत्त्वाचा आहे.

सध्याच्या काळात आपण सर्वजण आपल्या मुलांच्या बाबतीत सजग आहोत. आरोग्य दृष्टीने विचार करता आपण त्यांना दूध, खारीक, बदाम फळे इथपासून बाजारात मिळणारे हरतऱ्हेचे “प्रोडक्ट्स” देत असतो. यामागे हेतू इतकाच की त्यांचे पोषण चांगले व्हावे, आरोग्य चांगले रहावे. पण तरीही बरेच पालक अशी तक्रार करतात की.. “उशिराच दात आले” “उशिरा चालायला, बोलायला लागला” “तो/ती खातच नाही!” “जेवतच नाही” “खातो पण वजनच वाढत नाही” “वयानुसार उंचीत फरकच नाही” “चेहऱ्यावर डागच आहेत. कॅल्शिअम गोळ्या दिल्या पण तरीही कमी नाही” “चिडचिडा स्वभाव आहे” “हट्ट करतो” ह्या आणि अशा बऱ्याच तक्रारी तुमच्याही असतील. आणि हो… त्या असणं रास्तच! त्यामुळेच मुलांच्या आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते. आयुर्वेदामध्ये याच दृष्टिकोनातून बालकाच्या आहारानुसार तीन अवस्था म्हणजेच टप्पे वर्णन केले आहेत.

• पहिला टप्पा – क्षीराद – या अवस्थेमध्ये बालक केवळ दुधावर विशेषतः मातृ स्तन्य यावर अवलंबून असते. ही अवस्था जन्मापासून एक वर्षापर्यंतची मानली जाते.

• दुसरा टप्पा – क्षीरअन्नाद अवस्था – क्षीर (दूध) व अन्न या दोन्हींचे सेवन करणाऱ्या बालकास क्षीरअन्नाद असे म्हणतात. ही अवस्था एक वर्षानंतर दोन वर्षापर्यंत इतकी असते .

• तिसरा टप्पा – अन्नाद अवस्था – दोन वर्षापासून सोळा वर्षापर्यंतच्या काळाला अन्नाद अवस्था म्हटले जाते. या वयाच्या बालकांमध्ये खाण्याच्या चवी व सवयी यामध्ये परिवर्तन झालेले असते .

वरील सर्व अवस्थांमध्ये बालक संतुलित पोषक, सकस व आरोग्यदायी आहार घेत आहे की नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे ; कारण या घेतलेल्या आहारा पासूनच या बालकांचे शरीर व मन यांचे पोषण होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. सात्विक व ताकद देणारा आहार घेतला तर बालके सत्ववान सुदृढ निरोगी होतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तमच रहाते. अशा आहाराची सवय मुलांना या वयात लावली तर यातून निर्माण झालेली शारीरिक संपत्ती ही आयुष्यभर उपयोगी पडते.