
आज आपण सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, डोकेदुखी, अंग दुखत असेल, पाठ दुखत असेल इ. लक्षणांमध्ये घरात कोणत्या तपासण्या कराव्यात हे आपण पाहू.
अनेकदा सर्दी – खोकला असतो आणि अंगाचा स्पर्श थंड लागतो. त्यामुळे ताप आहे असे बाहेरून जाणवतच नाही. आता असे निरीक्षणात आले आहे की अशा रुग्णाला ताप मोजायला सांगितलं असता तर 102 डिग्री पर्यंत ताप आहे असं फोन करून सांगतात.
हे घरातही पहायला मिळाले आहे. त्यामुळे शरीरात सर्दी, खोकला, डोकेदुखी असे कोणतेही लक्षण दिसले की लगेच तापमान चेक करावे. थर्मामीटर घेऊन तोंडात जिभेखाली दोन मिनिटं ठेवावे आणि नंतर तापमान पहावे. तापमान नोंद करून ठेवावे.
असे तापमान मोजले म्हणजे ताप कसा वाढतोय आणि ताप कसा कमी होतो हे समजू शकते. त्यामुळे कमीत कमी औषधात आपण रुग्णाला बरे करण्यास मदत करू शकतो. मागील भागात आपण पाहिले 102 ताप असेल तरीसुद्धा आयुर्वेदिक औषधांनी ताप उतरतो.
डोलोसारखी औषधे द्यायची विशेष गरज पडत नाही. कालचाच अनुभव, घरात भाचीला 104 डिग्री ताप आला होता. आयुर्वेदिक औषधे आणि सोबत एक बेसिक अँटिबायोटिकची जोड दिली. एका दिवसातच आज सकाळी ताप शंभर पर्यंत आला आणि संध्याकाळी पूर्ण गेला.
आतून पूर्ण बरे व्हायला चार ते पाच दिवस लागतील. यामध्ये एकही डोलो, क्रोसिन सारखे औषध दिले नाही. कधी कधी ताप उतरायला 4 ते 5 दिवस अथवा जास्त कालावधीही लागू शकतो. पण धीर सोडू नये.
आता मनात प्रश्न येईल अँटिबायोटिक का दिले? सध्या परिस्थिती पाहता कोणतीही रिस्क घेऊ नये आणि जर आयुर्वेद आणि आधुनिकशास्त्र असा सुयोग्य संयुक्तिक उपयोग केला तर त्याचा फायदा रुग्णाला होतो.
योग्य रीतीने कमीत कमी औषधांमध्ये आणि जास्त साईड इफेक्ट न होता रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. योग्य रीतीने सर्व शास्त्रांचा उपयोग अचूक करणं हेच डॉक्टरचे कर्तव्य आहे. यामध्ये माझेच शास्त्र मोठे की दुसरे शास्त्र कमी हे मनात आणण्याची काही आवश्यकता नाही.
“रुग्णकल्याण होणे” ही एकच भावना अत्यंत महत्त्वाची आहे. आता चढाओढ आणि भांडायची वेळ नाही. तर एकत्र येण्याची वेळ आहे. एकीमध्येच विजय दडलेला आहे हे ह्या महामारीच्या रुपात निसर्ग वैद्यकशास्त्राला शिकवत आहे. जणूकाही हा संदेशच देत आहे असेच जाणवते.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरातसुद्धा पल्सऑक्सीमीटर ( pulseoximeter) असणे गरजेची बाब झाली आहे. दिवसातून दोन वेळा ऑक्सिजनची लेवल पाहणे गरजेचे आहे. आयुर्वेदिक औषधे देतो तेव्हा नक्कीच ऑक्सिजनची लेवल वाढते आणि पुन्हा खाली घसरत नाही हे अनुभवले आहे.
एकदा रुग्ण बसलेला असताना आणि ६ मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी पहावी. पातळी घसरत नाही ना हे चेक करावे.
ह्या दोन गोष्टी तपासल्यानंतर खूप काही मुद्दे लक्षात येतात. घरातच रुग्ण बरा होण्यास खूप मोठी मदत होते आणि चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरलाही औषध देण्यासाठी सोपे होते.
दररोज तापमान चार्ट आणि ऑक्सिजनची लेवल आपण नोंद करून ठेवली.
तर घरच्या घरीच रुग्ण बरा होण्यात नक्कीच यश येऊ शकते. मनातील भीतीही कमी होते. थोडीशी जागरूकता सर्वांनी ठेवली तर रुग्ण – डॉक्टर आणि घरातील सर्व मंडळी मिळून आपण या महाभारीवर नक्कीच विजय मिळवू शकतो. असे यश अखिल विश्वाला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
“सर्वे सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामयः ||”