
शरीरात घडणाऱ्या देवाणघेवाण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारा वायू म्हणजे समान वायू. याच्या नावाप्रमाणेच शरीरात सर्व गोष्टीत समानता टिकवून ठेवणे हे याचे काम. पचनाशी संबंधित सर्व कार्यामध्ये या वायूच्या सहकार्याशिवाय पचनक्रिया होऊ शकत नाही. हा पोटातील जठर, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत, स्प्लीन या ठिकाणी राहून अन्नपचनाच्या क्रियेत प्रत्यक्ष सहभागी असतो.
जठराच्या ठिकाणी ठराविक वेळ अन्न घुसळण्याची प्रक्रिया करणे, नंतर ते लहान आतड्यात पुढे सोडणे, तिथे पचनासाठी आवश्यक पित्त मिश्रणात सोडणे, अन्नाचा आवश्यक आणि टाकावू असे दोन चांगले भाग तयार करणे, आवश्यक भाग हृदयाकडे पाठवणे, टाकावू भाग पुढे मोठ्या आतड्यांकडे पाठवणे. अशी महत्त्वाची भूमिका समान वायू कडून बजावली जाते.
Healthy life via Samaan Pran Vayu
भूक आहे, नाही याची संवेदना या वायू कडून दिली जाते. पोट बिघडणे, पोटात गॅस धरणे, पोट गच्च रहाणे, पित्त होणे, सतत ढेकर येणे, भूक न लागणे, अती भूक लागणे, उलटी, जुलाब यांसारखे आजार हा वायू बिघडल्याने निर्माण होतात.
आपण घरात भाजी आणली की ती निवडतो, खराब, न लागणारा भाग जसे की देठ, मुळं आपण काढून टाकतो. का? तर त्याचा उपयोग नसतो. तशाच पद्धतीचे अन्नातील घटक निवडण्याचे काम या समान वायू कडून केले जाते.
चांगला भाग सुद्धा चांगलाच असला पाहिजे त्यात टाकावू भाग मिक्स झाला नाही पाहिजे, आणि टाकावू भाग सुद्धा तसा चांगला आणि खरंच टाकावू असला पाहिजे त्यात शरीराला आवश्यक भाग गेला नाही पाहिजे.
Digestive-system_views

कितीही चांगल्यातली चांगली मशीन करु शकणार नाही इतके सूक्ष्म लेवलचे डिस्ट्रिब्यूशन हा वायू करत असतो. म्हणून तर आपल्याला प्रत्येक अन्नपदार्थातील प्रोटीन्स व्हिटॅमिन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स यांसारखे आवश्यक घटक वेळोवेळी मिळत असतात.
आज जर अशी डिस्ट्रिब्यूशन करणारी मशीन तयार करायची असेल तर किती खर्च येईल याचा साधा विचार केला तरी डोके चक्रावून जाईल. पण निसर्गाने आपल्याला हे फ्रीमधे दिले आहे. ते टिकवले तर आपण जास्त दिवस टिकू.
अवेळी, कसलेही, एकाच प्रकारचे, अतिप्रमात्रेत, कमीमात्रेत असे चुकीच्या प्रकारचा आहार आपण सतत केला तर पचनशक्ती बिघडू लागते. ज्यांची पचनशक्ती चांगली नसते त्यांना आवश्यक घटकांची कमतरता भासत असते.
टाकावू घटक आवश्यक भागात मिसळून शरीरात पसरु लागतात. वजन वाढणे, संधीवात, कोलेस्टेरॉल वाढणे, हृदयविकार, मधुमेह यांसारखे कल्पनेच्या ही पलीकडे जाऊन विचार केला तर कळणार नाही असे आजार निर्माण होतात. त्यासाठी या वायूचे काम सुधारावे लागते.
आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात. त्यापैकी कोणते विचार आपल्याला योग्य अयोग्य हा निर्णय बुद्धी करते. योग्य विचारांची निवड करण्यात समानवायू मदत करतो. असा हा समानवायू मन बुध्दी यांच्या कार्यातही मदत करतो
इतर कुठल्याही शास्त्रात, आजार का निर्माण होतात यासाठी आणि शरीर, मन, बुध्दी टिकवण्यासाठीचा इतका सूक्ष्म विचार केलेला नाही. या आयुर्वेदाचे सूक्ष्म विचार सामान्य माणसाला कळावेत आणि ‘आरोग्य साक्षरता’ वाढावी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न.
चांगल्या वाईटाची ज्याला जाण
नावापरी जयाचे कर्म महान
दूधापासून करी पाणी विलग
अग्नी समीप शोभे राजहंस समान!
अग्नीला घाली फुंकर हळुवार
मल मूत्राचा जो संभाळतो व्यवहार
बऱ्या वाईट चूक भुलींचा करी विचार
तन मनाला वागवतो जो सम तो समान!