अन्नप्राशन विधी
या अवस्थेतील बालकांना आहार चालू करताना विधिवत “अन्नप्राशन विधी” करून तो चालू करावा. यांमध्ये अन्नपदार्थ चालू करण्यापूर्वी तांदूळ, डाळ शिजवून त्यांचे पातळ पाणी स्वच्छ पात्रांमध्ये घेवून विधिवत देवतांचे पूजन व आवाहन करून त्यांना नैवेद्य (भोग) देऊन मग सुरुवातीचा एक-एक चमचा ते बालकाला द्यावे. सुरुवातीला अन्नपदार्थ चालू करण्याचा मुख्य उद्देश बाळाला सर्व प्रकारच्या चवीचे पदार्थ खाण्याची सवय लागावी, तसेच त्याची पचनक्रिया वाढून दुधाव्यतिरिक्तही इतर पदार्थ त्याच्या पचनी पडावेत. दूध जरी सर्वोत्तम आहार असला तरी बाळाच्या वाढत्या वयानुसार त्याला आवश्यक ती सर्व पोषक तत्वे मिळून बालकाचा सर्वांगीण विकासास मदत होते.
क्षीरअन्नाद अवस्थेतील बालकांचा आहार –
सुरूवातीला बालकांना तांदूळ व डाळ यांची पातळ पेज देऊन ती पचनी पडल्यानंतर हळूहळू त्याची मात्रा वाढवत जाऊन तांदूळ व डाळ यांचे शिजवून खिरीप्रमाणे पातळ मिश्रण गुळ किंवा मीठ घालुन बालकास द्यावे. पुढे द्विदल धान्य चांगली शिजवून बारीक करून त्यांचे खिरी प्रमाणे मिश्रण द्यावे.
गव्हाचे किंवा ज्वारीचे, मूग डाळीचे पीठ तुपामध्ये भाजून त्याचे खिरी प्रमाणे मिश्रण करून बालकांना द्यावी. ते पचनी पडल्या नंतर मूग डाळ तांदूळ यांची मऊ खिचडी द्यावी. ती पचनी पडल्यानंतर बालकांना सूक्ष्म पोषक तत्वे व सर्व जीवनसत्वे मिळावीत यासाठी तीळ, जवस, काराळे, शेंगदाणा यांचे कूट तसेच पालेभाज्या फळभाज्या शिजवून चवीसाठी आले, धने, जिरे, मिरे घालून या अन्नपदार्थांत सोबत हळूहळू देण्यास सुरुवात करावी.
बालकाच्या वजन व उंची वाढीसाठी बदाम, खारीक, खोबरे, काजु, मनुके यांसारखा सुकामेवा कुटून बारीक करून खिरीमध्ये घालून दिल्यास व पचनी पडल्यानंतर त्याचेच तुपामध्ये मऊ लाडू करून बालकांना दिल्यास त्याचा फायदा होतो.
त्याचबरोबर गव्हाचा रवा, मुगाचा शिरा, उपीट व मऊ शिजवलेल्या शेवया, नारळीभात, लापशी यासारखे वेगवेगळे पदार्थ देऊन त्यांना सर्व पोषक तत्वे मिळतील याची काळजी घ्यावी.
हे सर्व पदार्थ करत असताना शक्यतो लोखंडी कढई तवा यांचा वापर करावा. तसेच सेंद्रिय गूळ व देशी गायीचे तूप वापरल्यास बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास होण्यास फायदा तर होतोच, पण शरीरात लोह, कॅल्शियम सर्व जीवनसत्वे प्रथिने यांची कमतरता भासत नाही. मुलांना मल्टीव्हिटामिन ची औषधे देण्याची गरज लागत नाही. हा काळ दात येण्याचा असल्यामुळे या काळात अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर बाळांना एक घोटभर तरी पाणी द्यावे जेणेकरून दाताच्या ठिकाणी अन्नपदार्थ राहून दात किडू नयेत.

क्षीरान्नाद अवस्थेतील फलाहार:-
या अवस्थेतील मुलांना सहा महिन्याचे झाले पासून फळे देण्यास चालू करावे. अगदी सुरुवातीला पिकलेली केळी कुस्करून मऊ करून द्यावी. त्याचबरोबर सफरचंदा सारखे फळ वाफवून देण्यास काही हरकत नाही. सुरवातीला संत्री-मोसंबी सारख्या फळांचे रसच देणे सुरुवातीला हितावह ठरते. बालकांना कोणतीही फळे वर्ज्य नाहीत, त्यांना फळे देत असताना सर्व सिजनल फळे घ्यावीत. एकदा फळे पचनी पडली की मग जी फळे सालीसकट देणे शक्य आहेत ती साली सकटच द्यावीत व मोसंबी संत्री चोथ्यासकट द्यावेत.
क्षीरान्नाद अवस्थेतील वर्ज्य अन्नपदार्थ:-
या अवस्थेतील बालकांना मसाले घातलेले तीक्ष्ण उष्ण पदार्थ देऊ नयेत. फास्ट फूड, जंक फूड यांसारखे पदार्थ बिलकूल देऊ नयेत. ब्रेड बिस्कीट चॉकलेट व मैद्याचे पदार्थ देऊ नये; त्यामुळे कृमीरोग पचनाच्या तक्रारी व मलावष्टंभ यासारखे विकार मुलांना होऊ शकतात. याशिवाय मुले दोन वर्षांची होईपर्यंत शक्यतो त्यांच्या आहारामध्ये साखर येऊ देऊ नये. पदार्थ गोड करण्यासाठी शक्यतो सेंद्रिय गुळ, पथरी खडीसाखर यांचा वापर करावा कारण साखर तयार होत असताना त्यात केमिकलचे प्रमाण जास्त असते.
अशाप्रकारे मुलांच्या आहार-विहार विषयक जागरुकपणे काळजी घेऊन पौष्टिक आहार मुलांना दिला तर मुले गुटगुटीत, बाळसेदार व निरोगी राहतात.