दुपारचे जेवण:-

मुलांचे दुपारचे जेवण झाल्यानंतर दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान फलाहार द्यावा.

मुख्यत: यामध्ये ऋतुनुसार म्हणजेच सीजनल फळ द्यावे. त्याचबरोबर ही फळे देताना शक्यतो सेंद्रिय असावीत किंवा पिकवण्यासाठी केमिकल ऐवजी नैसर्गिक पद्धतीचा वापर होतो आहे का हे पाहावे. अशी फळे मिळत असतील तरच सालीसकट द्यावी अन्यथा फळांच्या साली काढून ती मुलांना द्यावीत. सेंद्रिय फळे न मिळाल्यास मुलांना फळे देण्यापूर्वी दोन तास तरी मीठाच्या पाण्यात ठेवावी म्हणजे ऑस्मॉसिस होऊन त्यावर मारलेली पेस्टिसाइड चा प्रभाव कमी होईल.

मुलांनी सर्व प्रकारची फळे खाल्ल्यामुळे त्यांना आवश्‍यक असणारे सर्व जीवनसत्त्वे मिळतातच, त्याचबरोबर फळांद्वारे नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रुक्टोज शरीरात जाते व इतर गोड पदार्थ खाणे टाळले जाते; त्यामुळे भविष्यात मधुमेहासारखे व्याधी होण्याची शक्यता कमी होते.

चार वाजताचा खाऊ:-

बऱ्याच ठिकाणी मुलांना चार वाजता खाऊ म्हणून फरसाण, भेळ, चिवडा, भाकरवडी, ब्रेड-जाम अशा गोष्टी देण्याची अत्यंत चुकीची सवय असते जे शरीराला पोटाला अत्यंत अपायकारक तर आहे. मुलांना चटपटीत खाऊ देण्यापेक्षा पौष्टिक पदार्थ विशेषतः फळे या वेळात देणे जास्त आरोग्यदायी आहे.

मुलांना फळ देताना शक्यतो त्याआधी दोन तास व नंतर दोन तास तरी दुध व दुधाचे पदार्थ देणे टाळावे जसे दूध आणि केळाचे शिकरण. कारण ते विरुद्ध अन्न होत असते.

मुले या वेळात खायला अन्नपदार्थ मागत असतील तर त्यांना रवाडोसा, थालीपीठ, शेवयाचा भात, ढोकळा यांसारखे हलके व ताजे नाश्त्याचे पदार्थ करून द्यावेत, जेणेकरून मुलांना संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत चांगली भूक लागेल.

यानंतर मुलांना संध्याकाळी थोडे मैदानी खेळ खेळून देणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांची पचनशक्ती सुधारेल व भूकही चांगली लागेल.

सायंकाळी साधारणतः सात ते आठच्या दरम्यान मुलांना व्यवस्थित जेवण द्यावे. यामध्ये मुख्यतः भात, वरण, तूप, फळभाज्या, कडधान्य, भाकरी किंवा चपाती यांचा समावेश करावा.

मुलांना तोंडी लावायला मेतकूट, कोथिंबीर, आळू, कोबी, यांच्या वड्या द्याव्यात जेणेकरून हिरव्या पालेभाज्या आहारातून जाऊन सर्व जीवनसत्त्वे मुलांना मिळतील.

असा चौफेर सर्व अन्नधान्य, कडधान्य, डाळी, फळभाज्या, पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, फळे यांचा समावेश करून विविध पाककृती घरीच बनवल्या व पालकांनीही बाहेरचे अन्नपदार्थ घरी आणणे व स्वतः खाणे टाळले तर मुले सुद्धा ते खाणार नाहीत व त्यांची मागणी करणार नाहीत.

रात्री झोपण्यापूर्वी:-

रात्री झोपण्यापूर्वी साधारणता १० ते १०:३० ला मुलांना एक कप दूध द्यावे. या दुधामध्ये हिवाळ्यामध्ये शतावरी कल्प, उन्हाळ्यामध्ये गुलकंद तर पावसाळ्यात सुंठ वेलची घालून दिले असता आरोग्यासाठी हितकर होते व त्यांच्या चवीमुळे मुले दुध आवडीने पितात.

या प्रकारे मुलांना दिवसभरात कशा प्रकारचा आहार द्यावा याची विवेचन झाले.

मुलांच्या आहारातील विशेष काळजी

मुलांना आहारात ताक,कढी यासारखे पदार्थ आठवड्यातून दोन ते तीन वेळा द्यावेत जेणेकरून आतड्यातील गुड बॅक्टेरिया जे पचनाचे कार्य चांगले करण्यास मदत करतात ते वाढून पचनशक्ती चांगली सुधारते.

मुलांना ढोकळा,उत्तप्पा, इडली असे आंबवलेले पदार्थ देणे गरजेचे असते पण पंधरा दिवसातून ते एकदाच द्यावेत वारंवार देऊ नयेत कारण ते पचायला जड असतात.

मुलांना उघड्यावरचे अन्नपदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, वारंवार तळलेले पदार्थ, शिळे अन्न, फ्रिजमधील अन्नपदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, चॉकलेट, बिस्कीट, आईस्क्रीम, पनीर, मैद्याचे पदार्थ देणे टाळावे.

बाजारात असणारी प्रिझर्वेटिव्ह घातलेली आणि आरोग्यास हानिकारक अशी शीतपेय मुलांना तर देऊच नयेत त्याऐवजी ताक, पन्हे, मठ्ठा, लिंबू सरबत, कोकम सरबत, गुलाब वाळा यांचे सरबत, गुलकंद दूध, फळांचे दूध न घातलेले ज्यूस, उसाचा रस यासारखी पेये पिण्याची सवय लावावी. चहा कॉफी सारखीच उत्तेजक द्रव्य तर देऊच नयेत.

मुलांना मोरावळा, च्यवनप्राश, सुकामेवा, गुळ शेंगदाणे यांची गुडदानी दररोज खाण्यास द्यावी.

मुले जेवण व नाश्ता करत असताना त्यांना मोबाईल टीव्ही लावून देऊ नये यामुळे खाण्याकडे मुलांचे लक्ष लागत नाही व त्यांच्या ते अंगी सुद्धा लागत नाहीच.

मुलांना खाण्या-पिण्याच्या सवयी लावणे पालकांवर अवलंबून आहे मूळ पालकांनीच स्वयंशिस्त पाळली की मुले त्याचे अनुकरण करतील.

मुलांना आहारात दूध ,तूप,लोणी, ताक, बासुंदी यासारखी दुग्धजन्य पदार्थ त्यांच्या पचनशक्ती नुसार दिल्यास त्यांच्या वाढीसाठी व कॅल्शिअम मिळण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतात.

अशाप्रकारे सर्व आहारीय घटक गेले तर तुमची मुले सुदृढ निरोगी बुद्धिमान व तेजस्वी दिसतील.