बेकरी पदार्थांचा विचार करता त्यात मैदा असल्याने खाऊ नये हाच एक मुद्दा पटकन डोक्यात येतो. मैद्याशिवायही जास्त हानी पोहचवणारे आणखी तीन घटक आहेत.
१. साखर
२. मीठ
३. वनस्पती तूप/डालडा

डालडा कसा तयार करतात ते पाहूया.
विविध तेलांचेच तूपात रूपांतर केले जाते. हे रूपांतर करताना निकेल धातूच्या सान्निध्यात हायड्रोजन वायु सोडतात. निकेलधातूचे सूक्ष्म कण तूपातच रहातात जे आरोग्याला घातक आहेत. हायड्रोजनमुळे आम्लताही वाढते. तसेच फॉस्फोरिक अँसिड, कॉस्टिक सोडा, हायड्रोक्लोरिक अँसिड सारखी घातक रसायनेही वापरतात.
रिफाईन करण्याच्या नादात शरीरावश्यक तत्वे नष्ट होतात. अशाप्रकारे नैसर्गिक चरबीचे रुपांतर ट्रान्स चरबीत केले जाते व बेकरीचे विविध पदार्थ तयार करण्यासाठी डालडा सज्ज होतो आणि पाव, खारी, बटर, बिस्किट, केक इत्यादी पदार्थ आपल्या प्लेटमध्ये अवतरतात. आणि आपण त्यांचा सहजच फडशा पाडतो.
डालडा चे पचन कसे होते ते पाहूया.
आहारातील नैसर्गिक चरबीचे प्रथम यकृतात पचन होते. तिथे निर्विषीकरण (detoxify) केले जाते. तिथून ती आतड्यात व नंतर संपूर्ण शरीरात पोहचते. मानवी शरीरातील पाचकतत्वे ट्रान्सफॅट पचवू शकत नाही. ट्रान्स चरबीचे घटक आकाराने मोठे असल्याने ते यकृतात जाऊ शकत नाही.
परिणामी पचन न होताच अर्थात detoxify न होताच ते ह्रदयाकडे जातात. तिथून ते सर्वत्र शरीरात पसरतात. ट्रान्सचरबी व विविध घातक रसायने यकृत, प्लिहा, मूत्रपिंड, ह्रदय, रक्तवाहिन्या व ह्रदयातील झडपा,स्वादुपिंड मेंदू, मज्जातंतू इ. विविध अवयवांना इजा पोहचवतात. परिणामी विविध आजार होतात. अवयवांनाच हानी पोहचल्याने आजाराचे स्वरूपही गंभीर असते. रक्तातील आम्लताही अतिशय वाढते.
अनेकजणांची सकाळ चहा व बेकरीचे पदार्थांनी होते. आपणास वाटते की मी १-२ च बिस्किटे/खारी खातो. पण संपूर्ण ३६५ दिवसांचा विचार करावा. तसेच किती वर्षे खातोय ह्याचा ही विचार करावा. म्हणजे आपल्या रक्तात किती आम्लता वाढलीय हे लक्षात येईल. तसेच आपणास त्रास का होतोय हेही समजेल. हे स्वतःला समजले तर नक्कीच स्वतःमध्ये योग्य तो बदल करतोच.
बेकरी पदार्थ खाणे हा पाश्चात्य संस्कृतीचा नाइलाज आहे. पण आपल्या प्रत्येक प्रांतातील विविधतेने संपन्न खाद्यसंस्कृती पाहता भारतीय संस्कृतीची व्यापकता लक्षात येते. खरंतर हा विविधतेचा, संपन्नतेचा वारसा आपण ग्रहण करून पुढच्या पिढीला पोहचता करणे हे आपले कर्तव्य आहे.
तसेच वनस्पती तूपाला पर्यायही आपल्याकडे आहे. घरी बनवलेले साजूक तूप , लोणी हे पदार्थ वापरूही आपण अगदी बेकरीचे पदार्थही छान बनवू शकतो. त्यामध्ये सेंद्रिय गुळ , सैधव , गव्हाचे/ नाचणीचे/ मूगाचे पीठ वापरून आपण त्या पदार्थांची चवही छान वाढवू शकतो.
असे जागरूकतेने समजून पदार्थ बनवण्याची परंपराच आपण पुढच्या पीढीला handover शिकवली तर सर्वत्र आरोग्यच आरोग्य नक्कीच नांदेल आणि तेही शारीरिक – मानसिक – जीवाला तृप्त करणारे आत्मिकही!