वातावरण –
कोणतीही गोष्ट जितकी कोवळी, नाजूक असेल, तितकीच त्या गोष्टीला रोग किंवा इतर दुष्प्रभाव होण्याची शक्यता जास्त असते. जस पिकांना किंवा झाडांना ती कोवळी व लहान असताना जास्त जपावं लागत व एकदा मोठी झाली कि फारशी काळजी घ्यावी लागत नाही. तसेच मनुष्याचे आहे, कोणताही संसर्गजन्य आजार लहान मुलांना होण्याची शक्यता जास्त असते.

लहान मुलांना बऱ्याचदा वातावरणातील इन्फेक्शन लगेच पकडू शकते. त्यामुळे त्यांना छाती भरणे, सर्दी होणे अशी दूषित वातावरणाशी संबंधित लक्षणे काही प्रमाणात दिसू शकतात. यासाठी आयुर्वेदात धूपन म्हणजेच खोली शुद्ध करण्यासाठी धूप लावायला सांगितलेले आहे.
बालकाचा बिछाना, पांघरून घेणारे वस्त्र, अंगावर घालण्याचे वस्त्र, बालक असते ती खोली या सर्वांना हे धूपन केले जावे. यासाठी हिंग, वेखंड, गुग्गुळ, जटामांसी, कडुनिंबाची वाळलेली पाने किंवा साल हे सर्व समान मात्रेत घ्यावे आणि कापूर ही असावा. कापूर वापरताना शक्य असल्यास भीमसेनी कापूर वापरावा अथवा रोजच्या वापरातील चालेल.
नैसर्गिक सॅनिटायजेशन –
पूर्वीपासून धूपनासाठी गाईच्या गोवऱ्या (शेणी) वापरण्याचा प्रघात आहे. यातून गाईच्या शेणातील गुणधर्माचा चांगला उपयोग होतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी धूपनासाठी गाईच्या शेणी वापरायला हरकत नाही . वर दिलेले घटक भरड करुन एकत्र करून घ्यावे. साधारण चमचाभर भरड घेऊन त्यात एक कापूरवडी चुरा करून टाकावी आणि हे मिश्रण भिजेल एवढे म्हणजे साधारण एक चमचा तूप या मिश्रणात घालून सर्व मिश्रण एकजीव करावे व याचे शेणी वापरुन धूपन करावे.

संधीकाळ म्हणजेच सायंकाळी सहाच्या दरम्यान धूपन करावे. संध्याकाळी ६ वाजता शक्य न झाल्यास रात्री झोपण्यापूर्वी करु शकता. या धूपन क्रियेने रोग निर्माण करणारे जिवाणू नष्ट होतात आणि वातावरण शुद्धी होते.
याला पारंपरिक किंवा नैसर्गिक सॅनिटायजेशन म्हणू शकता.