
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आधुनिक शास्त्र विकसित होण्यापूर्वी भारतातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होते, परिपूर्ण होते. परकीय आक्रमणे, भारतातील लोकांचे आपापसातील भांडणे, अंधश्रद्धा , अज्ञान, ब्रिटिशांचा आपल्यावर झालेल्या प्रभाव , इत्यादी सर्वच कारणांमुळे आपली स्वयंपूर्ण समाजव्यवस्था कोलमडली.
गावातील परिपूर्ण अर्थव्यवस्था कोसळली. परिणामी पारंपरिक शेतीसारख्या व्यवसायाचे महत्त्व कमी वाटू लागले आणि माणूस शहराकडे धावू लागला. भारताच्या बदलत्या परिस्थितीनुसार दूधाला दोन प्रवासातून जावे लागले.

भारत स्वतंत्र होण्यापूर्वीचा दूधाचा प्रवास पाहू.
पूर्वी अगदी मुंबईतही मूळ रहिवासी शेती करायचे. भारतात शहरातही शुद्ध स्वरूपात दूध उपलब्ध होत होते. अनेक ठिकाणी शहरातही तबेले होते. गावात तर मोठ्या प्रमाणात गाई – म्हशी – शेळ्या पाळल्या जात. त्यामुळे घरातील मुलांना भरपूर प्रमाणात शुद्ध दूध उपलब्ध व्हायचे.
भारतात दूध विकले जात नसे. दूध विक्री करणे ही भारताची संस्कृती नव्हती. घरातील गायी – म्हशीच्या दूधावर त्या गाई-म्हशीच्या वासरांचा आणि घरातील लहान मुलांचाच अधिकार असे. त्यामुळे घरातील लहान मुलांना भरपूर प्रमाणात दूध उपलब्ध होत होते. तसेच ज्या घरामध्ये गाई-म्हशी नसतील त्या घरातील लोकांनाही गावातील एखाद्या घरातून शुद्ध स्वरूपातील दूध सहज उपलब्ध व्हायचे.
त्याचप्रमाणे तालुका – जिल्हा तसेच शहराच्या ठिकाणी सुद्धा ठिकाणी तबेले असायचे. आणि सकाळ-संध्याकाळ गाई म्हशींच्या धारा काढून झाल्यानंतर लगेच गवळी घरोघरी येऊन शुद्ध दूध पोचवत असे. त्यामुळे अगदी शहरात सुद्धा गाई म्हशीचे दूध उपलब्ध होते.
अगदी इंग्रज भारतातून निघून गेले त्यावेळी सुध्दा भारतामध्ये मनुष्याच्या लोकसंख्यापेक्षा देशी गाईंची संख्या जास्त होती असे सर्वेक्षणामध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे. असे म्हणू शकतो की अगदी आपल्या आजी आजोबांपासून ते आपल्या आई-वडिलांपर्यंत त्यांच्या बालपणात त्यांना भरपूर प्रमाणात शुद्ध दूध उपलब्ध झालेले आहे आणि त्याचाच परिणाम आपण पाहतो की त्यांची शारीरिक आणि मानसिक शक्ती आजही आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
स्वतंत्र भारतातील दूधाचा प्रवास समजून घेऊ.
स्वातंत्र्यानंतर जसे आधुनिकीकरण वाढले. परकीयांचा आपल्या जीवनावर प्रभाव घट्ट होत गेला. तसे आपल्या पारंपारिक शेती – पशुपालन इत्यादी जीवनपद्धती मागे पडू लागली. शहरांकडे माणसे धावू लागली. आकर्षित होऊ लागली. शहराची शेतजमीन ज्या ठिकाणी तबेले असायचे त्या जागी इमारती आल्या.
अगदी खेडेगावही शहरांसारखे दिसू लागले. याचा परिणाम असा झाला की जे दूध गोठ्यातून प्रत्येकाच्या घरोघरी डायरेक्ट पोहोचत होते ते दूध आता डायरेक्ट न पोहोचता पहिले दूधाच्या कंपनीमध्ये मुक्काम करून नंतर घरोघरी पोहचू लागले.
आपण आधीच्या भागांमध्ये पाहिले की शेतातील ऊस साखर कारखान्यात गेला आणि तिथून पोषणतत्वे हरवलेली – केमिकल युक्त अशी साखर तयार झाली.
अगदी तसाच प्रकार दूधाच्या बाबतीत घडला. पूर्वी प्रत्येक गावात अनेक ठिकाणी ऊसाची गुर्हाळे होती. त्यामुळे शेतकरी स्वतः ऊसाच्या रसापासून काकवी- गूळ पारंपरिक पद्धतीने बनवत होता. तसेच घरोघरी गाई-म्हशी असायच्या त्यामुळे घरचे दूध आहे त्या स्वरूपात लहान मुलांना मिळायचे. तसेच
तबेल्यातून गवळीमार्फतही धारा झाल्यानंतर डायरेक्ट दूध घरोघरी पोहोचत होते. त्यामुळे शुद्ध स्वरूपात दूध मिळत होते. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे गोठ्यातील दूध डेअरीमध्ये, डेअरीतून नंतर मिल्क फॅक्टरीमध्ये , फँक्टरीतून डिस्ट्रिब्युटरकडे, तिथून नंतर घरोघरी पोहचू लागले.
दूधाच्या ह्या प्रवासात दूधावर नेमके काय घडते हे पुढील भागात सविस्तर पाहूयात.