आईच्या आहाराचे महत्त्व –
निसर्गाने गर्भधारण करण्याची क्षमता ही स्त्रीला दिली आहे. जमीन ज्याप्रमाणे पेरलेल्या बियाण्याला कुशीत ठेवून त्याचे योग्य रोप तयार करते. तसेच स्री गर्भाशयात ९ महिने अंकुराचे पोषण करते. ९ महिने कालावधीत स्री शरीराच्या पोषक घटकावरच गर्भाचे पोषण होत असते. त्यामुळे प्रसूतीनंतर स्री शरीराला थकवा, दौर्बल्य येते. हा थकवा, दौर्बल्य भरुन काढणे हे बाळाच्या तसेच आईच्या आरोग्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे.
कारण *डिलिव्हरी नंतर फक्त एका बाळाचाच नव्हे तर एका स्त्रीचासुद्धा नवीन जन्म होत असतो.* बाळ नवीन शरीराने या जगात प्रवेश करते त्याच पद्धतीने स्री शरीर हे विवाहपूर्व कोमल शरीर गर्भिणी अवस्थेत खडतर आणि प्रसूतीनंतर पुन्हा नाजूक अवस्थेत येते. तिच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत झालेला बदल हा कमालीचा वेगळा असतो. विवाहित स्त्री आणि आई ह्या बदललेल्या भूमिकेत स्रीने *”गाफिल न राहता”* बाळासोबत स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करणे आवश्यकच आहे. डिलिव्हरी नंतरच्या दिवसापासून ते पुढचे जवळपास १० दिवस आईच्या आहाराकडे व विश्रांतीसाठी विशेष लक्ष दिले पाहिजे. प्राकृत डिलिव्हरी (नाॅर्मल डिलिव्हरी) झालेल्या स्त्रीच्या दृष्टीने आपण पहिला विचार करु..

पहिल्या दिवशी आहारात तुप घालून गरम भाताची पेज घेणे तसेच पोटाला कापडी पट्टा बांधणे आणि पूर्ण विश्रांती आवश्यक होय.
त्यानंरच्या दिवशी इतर औषधांसोबत ओवा आणि अशीच पेया देणे. मीठ किंवा मीठाचा जास्त वापर केलेले काहीही देऊ नये.
नंतरचे २ दिवस औषधांसोबतच भाताच्या पेजेत तूप घालून थोडी फोडणी घालून द्यावी. मीठ वर्ज्य. धूप द्यावा.
चौथ्या व पाचव्या दिवशी मातेला पान्हा फुटतो तेव्हा मऊ भात, तूप, शिरा द्यावा. दूध वाढीसाठी हळीव, बाळंतशेपा, खसखस असे पदार्थ आहारात द्यावे. शतावरी कल्प सुद्धा वापरला जातो. कोमट पाण्याने अंघोळ घालावी तसेच धूप द्यावा.
पुढचे ५ ते १० दिवस भूक लागण्यास सुरुवात होते. त्यामुळे खसखस, बदाम, हळीव यांची खीर, बाजरीची भाकरी, तूप हे आहारात द्यावे. तसेच कोमट पाण्याने अंघोळ करावी.
प्रसूतीनंतर आईच्या शरीरात वात वाढू नये म्हणून (यालाच बोली भाषेत वात्या म्हणतात) आहारात उष्णता, स्निग्धता वाढवणारे खसखस, बदाम, तूप, असे पदार्थ आहेत. पोटाला कापडी पट्टा बांधावा.
या दहा दिसांच्या कालावधीनंतर हळूहळू मातेचा आहार वाढवावा. आहार वाढवत असताना आईच्या भुकेचा व पचन शक्तीचा विचार करुनच आहार वाढवावा.