बालकांना अभ्यंग मालिश कसे करावे
बालकाच्या जन्मानंतर अगदी सुरुवातीपासूनच त्याला तेलाने मसाज किंवा मालिश केली जाते. त्याचा मुख्य उद्देश बालकांचे शरीर पुष्ट, ताकदवान, स्निग्ध व्हावे हे असते. बालक जन्मल्यानंतर त्याच्या शरीराला गर्भोदक व इतर स्त्राव चिकटलेले असतात अशावेळी सुरुवातीला खोबरेल तेलाने हलका मसाज केल्यामुळे हा चिकटा दूर होऊन प्रसूतीदरम्यान झालेले श्रम, पिडा, आघात यामुळे उत्पन्न झालेला थकवा दूर होतो. बालक साधारण एक ते दीड वर्षाचे होईपर्यंत त्यांना दररोज अभ्यंग करणे हितावह व आरोग्यदायी असते.

मुलांना मसाज करण्यासाठी शरीरासाठी हळदीचे तेल व टाळू भरण्यासाठी खोबरेल तेल वापरणे जास्त संयुक्तिक ठरते. अभ्यंगासाठी बालकाला पायावर घेऊन सुरुवातीला त्याची पुढची पाठीमागची टाळू भरून घ्यावी व त्यानंतर बेंबीवर तेल सोडून हलक्या हाताने घड्याळाच्या दिशेने मसाज करावा.
त्यानंतर बालकाला अनुलोम म्हणजे मांडी कडून पायाकडे या दिशेने मसाज करून तळपायाचा ही मसाज करावा त्याच बरोबर सर्व सांधे गुडघा, घोटे, बोटे याठिकाणी गोल गोल असा मसाज करावा. यानंतर बालकाला दोन पायांच्या मध्ये व्यवस्थित श्वास घेता येईल असे पायावर पालथे झोपवून गुदद्वारावर थोडेसे तेल सोडून नंतर माकड हाड व कंबर या ठिकाणी गोलाकार व इतर ठिकाणी वरून खालच्या दिशेने असा मसाज करावा.
हातांचा ही मसाज वरून खालच्या दिशेने म्हणजे दंडा कडून बोटाकडे या दिशेने करून सांध्याच्या ठिकाणी गोलाकार मसाज करावा.