चहाला सब्सिट्यूट विविध कषाय काढा | चहाला पर्याय!

चहाला पर्याय!

चहा –

निसर्गाने प्रत्येक प्रांतात मानवाला गरजेच्या भाज्या, फळे,वनस्पती निर्माण केल्या आहेत. चहा ही भारतीय वनस्पती नाही. मानव सोडून इतर कोणताच प्राणी समोर ठेवला तरी चहा पीत नाही. भारतात कुर्ग प्रांतात कॉफी तयार होते. तिथे ती गरजेची आहे. परंतु इतर प्रांतात त्याची आवश्यकता नाही. उष्णपेयाची तलप कषाय (काढे)पुरवू शकतात.

रक्त आम्लता वाढली की कोलेस्टेरॉल वाढते. तसेच आम्लता कमी झाल्यास कोलेस्टेरॉल ही कमी होते. क्षारीय पदार्थ रक्तातील आम्लता कमी करून रक्ताचा pH संतुलित करतात.

१) क्षारीय गुणाचे अर्जुनसालीचे चूर्ण पाण्यात घालून काढा करावा.त्यामध्ये गूळ व दूध ही घालू शकतो.

२) जीरे क्षारीय आहे.जीऱ्याचा काढा करावा. सोबत लिंबू, पुदिना, कोथिंबीर/धने घालू शकतो.

३) ओव्या चा काढा करावा.

४) आले, दालचिनी, मीरी,लिंबू घालून काढा.

५) तुलसी व आलं ह्याचा काढा.

६) गरम पाण्यात गूळ लिंबू घालून प्यावे.

७) शुंठीचा काढा

८) हळद, जेष्ठमध काढा

९) काहीच जमले नाही तर गरमपाणी प्यावे.

अशा रितीने आपण वेगवेगळे कषाय बनवू शकतो. वरील काही कषायांचे प्रकार हे कसे करायचे ह्याची कल्पना यावी ह्यासाठी दिले आहेत. त्यामध्ये स्वतः च्या कल्पना आणि आवडीनुसार बदल करू शकतो. अगदी एकेक घटक अथवा दोन – तीन घटक एकत्र करूनही कषाय करू शकतो.

कोणी कोणता काढा घ्यावा आणि घेऊ नये

उष्ण प्रकृती असल्यास आले, सुंठ, मीरी, लवंग जपून वापरावे. ज्यांना उष्णतेचा त्रास ( छातीत- पोटात जळजळ पाईल्स, फिशर इ.) आहे त्यांनी हे घटक वापरू नयेत. त्यांनी जीरे, पुदिना,जेष्ठमध, तुळशीची पाने, कमी प्रमाणात दालचीनी इ. घटक वापरावे.

ज्यांना कफाचा त्रास आहे अथवा कफ प्रकृती आहे त्यांनी कषायासाठी सुंठ, आले, मीरे, लवंग, दालचीनी इ. घटक जरूर वापरावे.

पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांत उष्ण घटक वापरू शकतो.

उन्हाळ्यात जीरे, पुदिना, धने, कोथिंबीर , लिंबाचे काही थेंब चवीनुसार, गुळ इ. घटक वापरु शकतो. उष्ण घटक वापरू नयेत.

कोणत्याही घटकांचा अतिरेक करू नये. पाण्यात थोडेसे औषधी गुणधर्म उतरून शरीरात चैतन्य निर्माण व्हावे हाच उद्देश आहे.

ह्या विविध कषायांनी शरीरातील आम्लतेचे पचन होउन ते मूत्रावाटे बाहेर निघून जाते व रक्त शुद्ध होते. पचनशक्ती सुधारते. शरीरातील वात- पित्त-कफ हे दोष संतुलित राहतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. आयुष मंत्रालयने भारतात काढ्याचे महत्व पसरवले आहे. पण काढा तयार करताना स्वतःची प्रकृती , बाहेरील निसर्गातील वातावरण काय आहे ह्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार काढ्यातील घटकांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. सरसकट सर्वांनी एकाच पद्धतीचा काढा घेतला तर काही त्रास निर्माण होण्याची शक्यता आहे. जसे छातीत- पोटात आग होणे, पाईल्स, फिशर इ. त्यामुळे प्रक्रुती, निसर्ग ह्यानुसार कषाय तयार करावा.

ग्रीन टी

चहा पावडर तयार करताना घातक रसायनांचा वापर करतात पण ग्रीन टी मध्ये रसायनांचा वापर न केल्याने चहाच्या पानांचा antioxidant हा गुण टिकून रहातो. परंतु चहा मधल्या टँनीन (सौम्य विष) मुळे नियमित प्यायल्याने त्याचेही व्यसनच जडते. ह्यानेही रक्त-आम्लता वाढते.

गवती चहा मध्ये ही टँनीन व टँनीक अँसिड आहे. ज्यांची प्रकृती उष्ण आहे, मूळव्याध, आम्लपित्त, फिशर, मलबध्दता असे त्रास असताना गवती चहा जपून वापरावा.

चहा-कॉफी च्या सेवनाने आपणाला तात्पुरती उत्तेजना मिळते. परंतु शरीरात दोष साठत जातात. कषायपानाने आपण आरोग्यपूर्ण चैतन्य अनुभवू शकतो.