
आज आपण पाहूया की घरामध्ये एखाद्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी झाल्यानंतर त्या व्यक्तीसोबतच इतर व्यक्तींनी काय खबरदारी घेणे गरजेचे आहे.
यापूर्वीही फ्ल्यूचा ताप हा ३ ते ५ अथवा ७ दिवस राहतो असे जुन्या सिनियर डॉक्टरांचे अनुभव आहेत. सोसायटीत एक ८० वर्षांचे सिनियर एम.डी.डॉक्टर आहेत. आम्ही लहान असताना त्यांच्याकडे जायचो तेव्हा ते काका आम्हाला तीन दिवस फक्त crocin द्यायचे.
ते म्हणायचे की व्हायरल ताप आहे तीन ते पाच दिवस राहील नंतर आपणहून कमी होईल. ते एकही अँटिबायोटिक द्यायचे नाहीत. अगदी गरज लागली तरच आणखी एखादे औषध द्यायचे.
अगदी आज तशीच परिस्थिती आपण मोठ्या प्रमाणात पाहत आहोत. बदलत्या वातावरण आणि महामारी नुसार आता आपणाला औषधांच्या बाबतीत मात्र आयुर्वेद आणि आधुनिक दोन्ही औषधांची संयुक्तिक जोड देणे गरजेचे आहे.
त्याविषयी अनुभव आपण आधीच्या भागात पाहिले. पूर्वीचे सिनियर डॉक्टर कमीत कमी रिपोर्ट करायचे आणि त्यांचं प्रॅक्टिकल ज्ञान आणि अनुभवही खूप मोठा होता त्याआधारे ते ट्रीटमेंट द्यायचे. अगदी कमीत कमी औषधाच्या मदतीने ते रुग्णाला सहजतेने बर करायचे.
हे सांगावसं वाटलं कारण वर्तमान महामारी चालू आहे त्यामध्ये येत असलेला ताप हा सुद्धा तीन, पाच, सात दिवस राहत आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये. वेळीच योग्य ती काळजी आणि योग्य तो औषधोपचार दक्षतेने केला तर नक्कीच सर्व काही ठीक होते.
घरात एका व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला झाल्यानंतर इतर व्यक्तींनाही एकापाठोपाठ सर्दी, खोकला, ताप यापैकी काही ना काही लक्षणे पाहायला मिळतात. अशी लक्षणे दिसली तरी घाबरून जाऊ नये आणि ती लक्षणे दिसू नयेत यासाठी घरातील सर्वांनीच काही नियम पालन करूयात.
घरातील प्रत्येक व्यक्तीने एकमेकांचे मनोबल वाढेल असेच वातावरण घरात ठेवावे. धीर सोडू नये.
आहारामध्ये घरातील व्यक्तींनीही हलके अन्न घ्यावे. एका वेळेस एकच प्रमुख धान्य जसे- तांदूळ, ज्वारी अथवा नाचणी आणि त्यासोबत डाळ, भाजी घ्यावी. एका वेळेला दोन मोठी धान्य घेऊ नये म्हणजे पचनावर ताण येणार नाही. शक्यतो गहू टाळावा.
आईस्क्रीम सारखे थंड पदार्थ, थंड पाणी टाळावे.
पाव, ब्रेड इ. बेकरीचे पदार्थ टाळावेत.
भात, भाजी, डाळी, कडधान्ये इ. कूकर मध्ये शिजवू नये. वरच शिजवावे म्हणजे पोषणमूल्य पूर्ण मिळतील.
गोड पचायला जड पदार्थ टाळावे.
शिळे अन्न खाऊ नये.
दुधाचे पदार्थ, ताक, दही बंद करावे.
कैरी आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तर घरात आजार असताना कैरीचे सेवन करू नये.
वेळेवर सर्वांनीच जेवावे.
भूक लागेल त्याच प्रमाणात आहार सेवन करावा. उपाशी राहू नये. पण दोन घास कमी खाल्ले तर जास्त बरे आहे.
अंडी, मटण, चिकन, मासे इ. मांसाहार काही दिवस तरी बंद करावा.
सर्वांसाठीच उकळून कोमट केलेले पाणी प्यायला दिले पाहिजे.
चहा ऐवजी पुदिना, तुळस, लवंग, दालचिनी, गवती चहा, आले, गूळ इ घटक घालून उष्णपेय घेवू शकतो. पण उष्णतेचा अतिरेक करू नये. नाहीतर मूळव्याध, फिशर सारखे त्रास होवू शकतात.
विरुद्ध आहार कटाक्षाने टाळावे. जसे – दोन आंबट फळे अथवा पदार्थ एकत्र खाऊ नये. मांसाहार आणि दूध, दुधाचे पदार्थ एकत्र खाऊ नये. फळे व दूध एकत्र खाऊ नये विरुद्ध आहार विषयीच्या भागात सर्व मुद्दे आपण सविस्तर पाहिले आहेच.
वारंवार अंघोळ आणि गार हवा टाळावी.
दिवसातून एक दोन वेळा प्रत्येकाने वाफ घ्यावी.
शक्य झाले तर धुपकांडी अथवा तूप आणि शेण्या जाळावे.
कृत्रिम उदबत्ती लावू नये.रात्रभर गुडनाईट लावू नये. गरज असेल तर थोडाच वेळ झोपण्यापूर्वी लावावे.
भक्तिसंगित, मंत्र श्लोक इ. जरूर लावावे.
प्राणायाम अथवा लेखातील सांगितलेला श्वासाचा प्रयोग सर्वांनीच दिवसभरात मध्येमध्ये जरूर करावा. त्यामुळेच मनोबल वाढण्यास प्रचंड मदत होणार आहे.
अशी खबरदारी सर्वांनीच घेतली तर एका व्यक्तीच्या आजारपणाचा इतर सदस्यांवर कमीतकमी दुष्परिणाम होईल. तसेच त्रास झाला तरी लवकर बरे होण्यास मदत होईल. तसेच ज्या घरात कोणताही त्रास नाही तरीही अशी खबरदारी सर्वांनीच घेणे गरजेचे आहे.
कारण माझ्या घरात नाही पण एक भिंत सोडून तरी कोणीतरी त्रासात आहे. आता संपूर्ण विश्वच आपले घर झाले आहे. त्यामुळं हे घरोघरी होणार आहे हे गृहीत धरूनच चालायचे आहे. आणि न घाबरता सर्वच खबरदारी घ्यायची आहे. एकमेकांची हिंमत वाढवायची आहे. आपण सर्वांनी मिळून ही परिस्थिती यशस्वीरित्या पार पाडायचीच आहे.