उन्हाळा आणि वर्तमान महामारी [Part 6]

Will summer slow the spread of COVID-19
Will summer slow the spread of COVID-19

            “शारीरिक मर्यादा असल्या तरी मनाची शक्ती मात्र अमर्याद आहे” हे सत्य अनुभवण्याची ही वेळ आहे. आज आपण ह्या महामारी विषयी सांगितलेल्या ” शारीरिक मर्यादा” विषयी पाहू.

       ज्यांचे वजन जास्त आहे (स्थौल्य), डायबेटीस, ब्लड प्रेशर, वयस्कर व्यक्ती अशा लोकांना ही महामारी होण्याची संभावना जास्त आहे. तसेच ह्या लोकांना महामारी  झाली तर त्यांना बरे होण्यासही अनेक अडथळे येतात असे सांगितले आहे. हे सांगणे चूक नाही.

परंतु ह्या गोष्टीचे “मनात घर करून घेणे आणि भीतीने जगणे” हे मात्र नक्कीच चूक आहे. कारण प्रत्यक्षात अनेक वयस्कर व्यक्तींनी , स्थूल , तसेच डायबेटिस, ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींनी ह्या महामारीवर यशस्वी मात मिळवलेली नक्कीच पहायला मिळते.

९२ वर्षाच्या नाजूक, डायबेटिस तसेच कॅन्सर इतिहास असलेली आजीही बरी होवून घरी आलेली पहिली आहे. अगदी ९५ kg वजन असलेली व ब्लडप्रेशर असलेली  व्यक्तीही घरीच बरी झालेला अनुभव आहे. हे अनुभव  अगदी जवळचेच आहेत.

ह्या अनुभवातून  एकच जाणवले की भले वैद्यक शास्त्राने शारीरिक मर्यादा सांगितल्या असतील पण ह्या सर्वच व्यक्तींनी त्यांच्या मनाच्या जिद्दीने आणि मनाच्या अमर्याद शक्तीने ह्या महामारीवर  विजय मिळवला.

त्या सर्वांनीच अत्यंत प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले की “मनाची शक्ती, योग्य वेळी योग्य औषधोपचार, योग्य दक्षता घेतली तर नक्कीच बरे होवू शकतो. शारीरिक मर्यादा आजारावर मात करण्यात आड येऊ शकत नाही.” 

           तसेच अशा प्रकारची महामारी विश्व पहिल्यांदाच अनुभवते असेही नाही. संपूर्ण विश्वात अशा अनेक महामारी अनेक देशात येवून गेल्या आहेत. ह्या महामारीमागे विध्वंसक मानवाचा हात आहे असे अंदाज वर्तवले जातात.

मानवाची हीच विध्वंसक वृत्ती यापूर्वीच्या अनेक महामारीतही कारण होती असे दाखले इतिहासात नमूद आहेत. आता सोशल मीडियामुळे जास्त आवाज ऐकायला मिळतोय. जशी जागरूकता निर्माण होतेय पण सोबत अत्यंत भीतीचे आणि गोंधळाचे वातावरणही सर्वत्र पसरले आहे.

पूर्वी आजच्याइतके सोशल मीडियाचा  विकास नव्हता. त्यामुळे लोक शांतपणे आणि धीराने आलेल्या संकटांना सामोरी गेली. खरे तर ह्याहीपेक्षा भयंकर महामारी आपल्या देशानेही अनुभवली आहे. आदरणीय ज्येष्ठ संशोधक चिकित्सक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचा एक लेख वाचण्यात आला.

डॉ. बावस्कर ह्यांनी विषारी विंचू दंशावर औषध शोधून काढले. कोकणात तसेच भारताबाहेरही विंचू चावल्याने पूर्वी अनेक लोक मृत्युमुखी पडायचे. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे आज  विंचूदंशामुळे कुणीही मृत्यूमुखी पडत नाही.

त्यांनी आपल्या लेखात स्पष्ट लिहिले आहे, “१९व्या शतकात प्लेगच्या साथीने भारतात खूपच रुग्ण दगावले. गावेच्या गावे खाली झाली. सावित्रीबाई फुले यांनी डॉ. यशवंत यांना बोलावून घेतले व हडपसर मध्ये झोपडित दवाखाना उघडून सुश्रुषा सुरू केली.

सावित्रीबाईंच्या कार्यकर्त्यांला प्लेग झाला तेव्हा त्याला कोणी हात लावेना. शेवटी सावित्रीबाईनी त्याला पाठीवर घेतले व दवाखान्यात नेले. नंतर सावित्रीबाईंना प्लेग झाला व त्यातच त्या दगावल्या.” हा अनुभव किती भयंकर आहे. ह्या तुलनेत निदान आज नक्कीच सुसह्य परिस्थिती आहे असे समजू शकतो.

                  हे शेअर करावेसे वाटले कारण आज घरोघरी ही महामारी आपण अनुभवतोय. अशा वेळी “सकारात्मकता वाढवणे” हे अतिशय गरजेचे आहे. यापूर्वीही  यापेक्षाही भयंकर महामारी देशाने अनुभवली आहे. त्यावेळी आपण मात केली तर आत्ताही नक्कीच मात करणार आहोतच.

काही गोष्टी जागरूकतेने समजणे आणि पाळणे गरजेचे आहे.

         कोणत्याही परिस्थितीत एकही विचार मनाची शक्ती कमी करणारा येत नाही ना, एकही शब्द माझी स्वतःची आणि  इतरांची हिंमत कमी करणारा मी बोलत नाही ना, एकही मेसेज मी धीर कमी करणारा वाचत ऐकत आणि पाहत नाही ना ही खबरदारीही घेणे अत्यंत गरजेचे आहे.

अगदी मास्क लावतो तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त.