
आज सर्दी, कफ, ताप, अंगदुखी, घसादुखी, डोकं जड होणे इ. तक्रारींमध्ये काय आहार विहार असावा याविषयी काही मुद्दे पाहू.
शरीरातील पचनशक्ती मंद होते. त्याच वेळेला शरीरामध्ये कफ निर्माण होतो, खोकला येतो, ताप येतो, अंगदुखी होते. ही लक्षणं अन्नाचे पचन व्यवस्थित न झाल्याने निर्माण होतात. अन्नाचे पचन न झालेले घटक पचवण्यासाठी शरीर स्वतःच तापमान वाढवते आणि त्यामुळे ताप निर्माण येतो.

खरे तर शरीराने स्वतःच स्वत:ला निसर्गत: बरे करण्यासाठी केलेली ही मदतच आहे. हे लक्षात घेता ज्यावेळी ताप येतो, कफ वाढतो त्यावेळी भूक लागतच नाही. त्यामुळे जबरदस्ती खाऊ नये त्याऐवजी “लंघन” करावे. म्हणजे उपवास करावा. याने अशक्यपणा येत नाही. उलट फायदाच होतो.
कडकडून भूक लागेल त्याच वेळेला हलका आहार सेवन करावा. जसे तांदळाची पेज, ज्वारीचे आंबील ( ताक न घालता), मुगाचे कढन, भाज्यांचे सूप इ. असे भूक लागल्यानंतरच पातळ द्रव स्वरूपातला हलका आहार सेवन करावा. नंतर जशी भूक वाढेल तसे हळूहळू पातळ खिचडी, नंतर ज्वारीची भाकरी असे खाण्यास सुरू करावे.
लंघन केल्याने न पचलेले अन्नघटक पचवायला शरीराला सोपे जाते आणि ताप लवकर बरा होतो. तसेच आयुर्वेदिक औषधे रिकाम्या पोटीही घेवू शकतो. त्यामुळे खाल्लेच
पाहिजे असे नाही.
थंड पाणी, थंड पदार्थ, कच्च्या भाज्या, फळे यामुळे शरीरामध्ये द्रवता निर्माण होते, पाण्याचे प्रमाण वाढते म्हणून ते टाळावे.
पाणी उकळून कोमट करावे आणि नंतरच प्यावे. तहान लागेल तेव्हाच जितकी तहान असेल तितकेच प्रमाणात पाणी प्यावे. तहान नसताना पाणी पिऊ नये.
बेकरीचे पदार्थ, बिस्किटे, बटर, ब्रेड इ. खाऊ नये. हॉस्पिटल मध्ये नेमके चहासोबत बिस्किटे देतात.
दूध, दही, ताक हे व इतर दुधाचे सर्व पदार्थ बंद करावे.
गहू किंवा गव्हाचे पदार्थ खाऊ नये.
तळुन काढलेले सर्व पदार्थ बंद करावे.
कोरडा खोकला असेल तर हळद दूध दिले जाते.
हळदीचे दूध तयार करण्याची पद्धत – :
१) १ कप पाणी,
२) अर्धा कप दूध,
३) अर्धा चमचा हळद,
४) चिमुटभर सुंठ घालून दूध आटवावे.
१ कप झाले की ते दूध द्यावे. हळदीच्या दुधात दुधापेक्षा पाणी जास्त असावे. म्हणजे ते पचायला हलके होते.
अंडी, मासे, मटण, चिकन इ. मांसाहार पूर्ण बंद असावा.
ताप उतरल्यावर सुध्दा पुढे १५ दिवस तरी पचायला हलका आहारच घ्यावा. गहू देवू नये.
ताप उतरताना अतिशय घाम येतो. अनेक दिवस ताप असेल आणि crocin सारखी औषधे जास्त दिली गेली तर वारंवार जबरदस्ती घाम येतो आणि ताप उतरतो. नंतर पुन्हा चढतो. असे झाल्याने रुग्णाला खूप थकवा येतो. अशा वेळी अर्धा ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा सैंधव मिसळून प्यायला द्यावे.
ते पाणी घोट घोट करून सावकाश प्यावे. म्हणजे शरीरात पोषकतत्त्व मिळतात आणि थकवा जाणवत नाही.
शक्यतो crocin सारखे औषधे टाळावीत. आम्ही १०२°F ताप असेल तरी crocin देत नाही. आयुर्वेदिक औषधांनी ताप एकदम कमी न होता हळूहळू कमी होतो. त्यामुळे थकवा जास्त येत नाही. जास्त ताप असला तरी धीराने घेतले तर शरीराला नुकसान न पोहचवता ताप बरा होवू शकतो.
ताप असताना अंघोळ करणे सुद्धा टाळावे. गरम पाण्याने अंग पुसू शकतो. कारण शरीरातली उष्णता पचन न झालेले अन्नघटक पचवण्यासाठी वापरली जात असते. उष्णतेच्या या कामात कोणताही अडथळा आणू नये.
शरीर उबदार राहील याकडे लक्ष द्यावे. फॅनखाली डायरेक्ट झोपू नये.
ताप खूपच जास्त असेल तर थंड पाण्याने संपूर्ण अंग पुसायला ( sponging) सांगतात. पण थंड पाण्याऐवजी पाणी गरम करून त्यामध्ये कापड बुडवून ओले करून अंग पुसावे. नंतर पुन्हा ते कापड पाण्यात बुडवून घट्ट पिळून त्या कापडाने पुन्हा अंग पुसावे.
ओल्या कपड्याने अंग ओले करावे आणि पुन्हा अंग कोरडे करावे. ही क्रिया वारंवार करावी.आणि नंतर अंगावर चादर पांघरून झोपावे. असे sponging केले असता ताप १ डिग्रीने कमी होतो आणि त्वचेची छिद्रे मोकळी होतात.
त्यामुळे भरुपूर घाम येऊन ताप कमी होण्यास मदत होते. पण ह्यामध्ये थंड पाणी वापरू नये. आयुर्वेदानुसार थंड पाणी वापरणे अत्यंत चुकीचे आहे. थंड पाणी वापरले तर ताप कमी झाला तरी नंतर कफ, खोकला, सुका खोकला होण्याची शक्यता असते.
ह्यासाठी १०४ – १०५ असा ताप आहे आणि उतरतच नसेल अशा वेळी अंग पुसताना ( sponging) गरम पाण्याचाच वापर करावा.
ताप असताना पाठीच्या कण्यात अतिशय वेदना होतात. गरम पाण्याची पिशवी अथवा तवा गरम करून त्यावर कपडा गरम करून त्याने पाठ शेकावी.
ताप कमी झाले की पाठ दुःखी कमी होते.
उन्हाळा आणि वर्तमान महामारी [Part 1]
उन्हाळा आणि वर्तमान महामारी [Part 2]