पहिला टप्पा – क्षीराद अवस्था
याकाळात बालक दुधावर विशेषतः मातृ स्तन्यावर अवलंबून असते. मातेने घेतलेल्या आहाराचे पचन होऊन मातेच्या स्तनांद्वारे दुधाची निर्मिती होत असते; म्हणून प्रसूतीनंतर मातेने सकस सुपाच्य, हितकर व पथ्यकर असा आहार घेणे, वेळेवर घेणे अत्यंत गरजेचे असते. त्याचबरोबर तिची झोप व विश्रांतीही तिने योग्य प्रमाणात घेणे गरजेचे आहे. मातेच्या जेवणाच्या वेळेतील बदल तसेच अपथ्यकर आहारामुळे निर्माण होणारे दूध हे “सदोष” असते. त्यामुळे बालकास जुलाब, उलटी, ताप येणे, पोट दुखणे यांसारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे मातेने पथ्यकर आहारच घ्यावा.
आयुर्वेदात मातेचे दूध हे
• सर्व पोषक तत्त्वांनी युक्त (जीवनीय)
• शरीराची योग्य वाढ करणारे
• बालकांसाठी सर्व बाजूंनी चांगले
• डोळ्यांसाठी हितकर
• बालकाचे बल वाढविणारे
• पचण्यास हलके
• पचन सुधारणारे
• भूक वाढवणारे
• अती झालेले वात-पित्त कमी करणारे
• रक्तातील दोष दूर करणारे
असे वर्णन केले आहे.
बालक जन्माला आल्यापासून पहिल्या अर्धा ते एक तासात मातृ स्तन्य देणे गरजेचे आहे कारण हे दूध जास्त प्रमाणात अँटीबॉडीज असल्यामुळे घट्ट असते त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते. त्या दुधामुळे बाळाच्या रक्तातील शर्करा कायम नॉर्मल राहतात.
बाळाला दूध पाजण्यासाठी जवळ घेतल्यामुळे आईच्या मनात वात्सल्य भाव निर्माण झाल्यामुळे प्रसूतिवेदनेचे दुखः कमी होते व आईच्या शरीरात उत्तेजना निर्माण होऊन दुधाची निर्मिती होते. यालाच आपण “पान्हा फुटणे” असेही म्हणतो. यावेळी बाळाला आईने छातीजवळ घेतल्यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान वाढून तापमान संतुलित राहते. बाळासाठी मातृ स्तन्यच श्रेष्ठ कारण यामुळे रोगप्रतिकारक क्षमता शारीरिक व बौद्धिक वाढही चांगली होते.
जेंव्हा बाळ अंगावर पिते तेव्हा त्याची “पंचज्ञानेंद्रिये” आईकडे एकवटलेली असतात,
• कानाद्वारे आईचे हृदयाचे ठोके गुणगुणणे ऐकते
• त्वचेद्वारे आईचा स्पर्श जाणवतो शरीराचे तापमान नियंत्रित राहते
• डोळ्यांद्वारे आईचे वात्सल्य रूप पाहते
• जिभेने ते दुधाच्या चवीचा आस्वाद घेते
• नाकाद्वारे आईचा गंध अनुभवत असते.
त्यामुळे त्याचा बौद्धिक विकास खूप चांगला होतो. त्यामुळे बाळाला अंगावर पाजत असताना मोबाईल, टीव्ही यांसारखे मन विचलित करणाऱ्या उपकरणांपासून आईने स्वतःला आणि बाळाला दूर ठेवावे. आपल्या लाडकीला किंवा लाडक्याला आईने आपल्या मायेची उब द्यावी. कारण सद्यस्थितीत बऱ्याचदा मुलांना टीव्ही मोबाईल लावून देऊन दूध देणे ,खायला देणे अशा सवयींमुळे नक्कीच बौद्धिक क्षमता वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो.
बाळाच्या भुके नुसार बाळाला दूध देण्याची वेळ वेगवेगळी असू शकते; साधारणता: दोन दोन तासाच्या अंतराने बाळाला दूध द्यावे. बाळाला भूक लागली की ते रडते परंतु प्रत्येक वेळी त्याच्या रडण्याचा तोच अर्थ घेऊ नये. बाळाला दिवसातून सहा ते सात वेळा लघवी झाली तर बाळाची भूक दुधाने व्यवस्थित भागून त्याचे डिहायड्रेशन होत नाही त्याचे हे प्रतीक आहे.